Ad will apear here
Next
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा


‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’
 या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग..... 

.........
इंग्रजांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज भारत सोडून निघून गेले. १५० वर्षांच्या या कारावासात भारतीयांनी अनेक यातना भोगल्या. देशाला इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या असंख्य क्रांतिकारकांना प्राण गमवावे लागले. परंतु, २०व्या शतकाच्या या व्यापारोत्पन्न युगात आजही आपण इंग्लंडशी सलोख्याचे संबंध जतन करून ठेवले आहेत. 

दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्य फ्रान्सचा अभिमान असलेल्या आयफेल टॉवरपर्यंत आले होते. असे होऊनही आज फ्रान्स आणि जर्मनी हे दोन्ही देश युरोपीय युनियनमध्ये सहभागी आहेत. 

या दोन प्रसंगांचा उल्लेख करायचा हेतू म्हणजे, दोन्ही देशांमध्ये सीमेवर किंवा इतर कोणत्याही कारणाने सामंजस्याचे संबंध नसतील तरी २१व्या शतकातील व्यापार व दळणवळणामुळे हे संबंध आर्थिकदृष्ट्या आड येत नाहीत आणि आले तरी ते काही ठरावीक काळापुरते मर्यादित असतात.

चिनी व्हायरस म्हणून ओळखला जाणारा ‘करोना’ हा आजही अजिंक्य आहे आणि कोणत्याही देशाला आजपर्यंत त्यावर ठोस औषध मिळालेले नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरणे यांसारखे उपाय वगळता, जगातील कोणत्याच देशाला भक्कम उपाय सापडलेला नाही. या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे त्यामुळे स्वाभाविकपणे संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. करोनाच्या साथीने परमोच्च टोक गाठलेले असतानाच, भारतीयांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आली. ही बातमी चीनचा गलवानवरील हल्ला आणि त्यामध्ये शहीद झालेले शूर जवान याविषयी होती. साहजिकच प्रत्येक भारतीयाचा चीनवरील राग दुणावला आणि चीनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी लाट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेने भारतीय बाजारपेठ व उत्पादक यांचे लक्ष वेधून घेतले आणि ‘व्होकल फॉर लोकल’चे वारे वाहू लागले. 

वास्तविक, एक भाषातज्ज्ञ म्हणून आणि चीनमध्ये वास्तव्य केलेले असल्यामुळे ‘बॉयकॉट चायना’ हे शक्य नाही, हे मला कळून चुकले. परंतु, देशात चीनविरोधी भावना निर्माण झाल्याने पंतप्रधान मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ला नकळतच ‘बॉयकॉट चायना’चे वळण लागले. खरे तर, ‘आत्मनिर्भर भारत’चा अर्थ आहे, स्वदेशी वापरा व स्वतः बनवा. परंतु, तो समजून घेण्यात आलाच नाही. 

तसेही, पूर्णपणे आत्मनिर्भर होणे इतके सोपे नाही. हा २५ ते ३० वर्षांचा एक अथक प्रवास आहे आणि त्याची पायाभरणी पंतप्रधानांनी केली आहे. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, आपला देश चीनकडून मोठ्या प्रमाणात गोष्टी आयात करतो. असे एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये चिनी कच्चा माल किंवा तंत्रज्ञान वापरले जात नाही. परंतु ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न साकारण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे भारतात उत्पादन करणे. तंत्रज्ञान, यंत्रसामग्री भलेही आयात केलेली असेल. परंतु उत्पादन भारतात केलेले असेल तरच ‘व्होकल फॉर लोकल’ला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. या पर्यायाने, भारतात रोजगारनिर्मिती होईल आणि स्वयंपूर्ण भारत हे चाक फिरण्यास सुरुवात होईल.

या प्रवासाची दुसरी पायरी म्हणजे, तंत्रज्ञान बाहेरून (चीनकडून) घ्यायचे, पण मशीन भारतात बनवायचे. भारतातील मेकॅनिकल इंजिनीअर नक्कीच इतके कुशल आहेत, की तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर ते यंत्रसामग्री बनवू शकतात. आज आपण मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आयात करतो. त्यातील बहुतांश भारतातही बनवली जाते; पण त्यांची किंमत चिनी यंत्रसामग्रीच्या तुलनेत जास्त आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठा अडथळा म्हणजे, यंत्रसामग्री बनवून द्यायचा कालावधी. चिनी कंपन्या निर्यात करायची असतानाही तुलनेने ६० ते ७० टक्के कमी वेळात यंत्रसामग्री भारतात पोहोचती करतात. त्यामुळे स्वाभाविकच कारखानदार चीनकडून यंत्रसामग्री आणण्यास प्राधान्य देतात. 

चीन आज इतका पुढे आणि प्रगत का आहे, याचा अभ्यास करून आपण आपला प्रगतिपथ आखला पाहिजे. फक्त राग आहे म्हणून चिनी वस्तूंवर बंदी घालणे, हे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. 

अमेरिका आणि चीन यांच्या व्यापारयुद्धामुळे भारतासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मागील लेखांमध्ये आपण त्याचा सखोल आढावा घेतलेला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. द्राक्षे, सोयाबीन, आयुर्वेदीय औषधांसाठी कच्चा माल चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. यासारख्या अनेक संधीही सध्या या क्षेत्रांत आहेत. चिनी बाजारपेठ भारतासारखीच अवाढव्य आहे आणि त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे.



आणखी एका महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये भारत चीनबरोबर काम करू शकतो, हे क्षेत्र म्हणजे बॉलिवूड, भारतीय सिनेमा किंवा मनोरंजन. चीनमध्ये बॉलिवूड सिनेमे लोकप्रिय आहेत. सासू-सुनेच्या मालिकाही चिनी महिला तन्मयतेने पाहतात. डॉक्युमेंटरी, शॉर्ट-फिल्म यांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढते आहे. व्यापाराबरोबरच कला क्षेत्रातही भारत आणि चीन नक्कीच एकमेकांना साह्य करू शकतात. 

‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या मालिकेमध्ये आपण चीनने भारतातील विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल वाचले. याचा सविस्तर विचार करता, चीनबद्दल द्वेष व राष्ट्रभाव मनात ठेवून वैमनस्य बाळगले तर त्याचा भारतावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याउलट, स्वतःची मते व भौगोलिक सीमा सुरक्षित ठेवून व्यापारी संबंध वाढीस लावले, तर येणारा काळ नक्कीच सोन्याचा असेल, यात शंका नाही. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रथम चीन व चिनी कंपन्यांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर त्यांचे साह्य घेऊन आपली उत्पादनक्षमता वाढवणे व वस्तूंचे दर कमी करणे आवश्यक आहे. आपण निर्यातीमध्येही वाढ करायला हवी. त्यामुळे आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन एका नव्या स्वप्नाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. 

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DWLSCR
Similar Posts
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
भारतात चीनची गुंतवणूक आहे तरी किती? चीनवर बहिष्कार हा जिव्हाळ्याचा विषय झाला आणि सामान्य नागरिक भावनेच्या भरत वाहवत गेला. आणि त्याने सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चीनवर बंदी कधी आणणार? चिनी मालावर बंदी कधी घालणार? पण वस्तुस्थिती काय आहे? चीनची भारतातील गुंतवणूक कशी आणि किती आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहू या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या चौथ्या भागात
कृषिप्रधान चीन जगाची ‘फॅक्टरी’ कसा बनला? फक्त भारतच नाही, तर जगातील अन्यही बहुतांश देश आपल्या सण-समारंभांचे सामान चीनकडून खरेदी करतात. अमेरिकेत हॅलोवीनपासून ख्रिसमसपर्यंतच्या सगळ्या सणांना लागणारे साहित्य चीनमध्ये बनवले जाते. साहजिकच मनात येते, जगाच्या लोकसंख्येसाठी पुरवठा करू शकेल, इतके उत्पादनसामर्थ्य चीनकडे आले कुठून? एक कृषिप्रधान देश अवघ्या
चीनचा नवा विस्तारवाद – वन बेल्ट वन रोड शी जिनपिंग नोव्हेंबर २०१२मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि लगेचच मार्च २०१३मध्ये ते चीनचे अध्यक्ष झाले. चीन आधीपासूनच पाहत असलेले विस्तारवादाचे स्वप्न जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर आणखी गडद झाले. त्याबरोबरच, आणखी महत्त्वाकांक्षी स्वप्ने व भौतिक विस्तारवाद साकारण्याचीही तयारी सुरू झाली. ही तयारी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language